करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. नागपुरातील एका टेलरनंही लॉकडाऊनमुळं उद्भवलेल्या आर्थिक चणचणीमुळं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Suicide
नागपूर: करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं उद्भवलेल्या आर्थिक चणचणीतून टेलरनं गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपुरातील धनवंतरीनगर येथे ही घटना घडली. प्रकाश सेलोकर (वय ४०) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश यांचा कापड विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून ते कापड शिवण्याचे काम करायचे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा शिवणकाम व्यवसाय ठप्प झाला. त्यांनी भाजीपाला विकायला सुरुवात केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते तणावात होते. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रकाश यांनी स्वयंपाक खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी प्रकाश यांचा मृतदेह 'मेडिकल'मध्ये पाठवला. आर्थिक विवंचनेतून प्रकाश यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.