ठळक मुद्देआत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे मृताचे नाव आहे.
ज्ञानेश्वर हा काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे तो नांदगाव खंडेश्वर येथे अडकून पडला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर प्रशासनाच्यावतीने स्वगृही पाठविण्यात आले. त्यात तोही गावी परतला. आरोग्य तपासणी करून ज्ञानेश्वर अंगारे याला गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत २० मे रोजी विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ज्ञानेश्वर अंगारे यांनी शाळेनजीक असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रात्री दरम्यान तो स्वत:च्या घरी गेला. रात्रीच घरातून साडी घेऊन तो बाहेर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह त्याच्याच घरालगतच्या पिंपळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही बाब शनिवारी सकाळी उघड झाली. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ज्ञानेश्वरच्या पश्चात पत्नी, सात वर्र्षांची मुलगी व दोन चिमुकली मुले आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
२० मे रोजी संबंधित इसमाला पिंपरी जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
- संजय सोळंके, ठाणेदार, मोर्शी
Web Title: Suicide by quarantine person; Incidents in Morshi taluka of Amravati district
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.