हैदराबादेतून 450 किमी चालत वर्ध्यात पोहोचला, गोंदियाला जाताना थकला, वाटेतच गळफास

हैदराबाद येथून 450 किमी चालत आलेल्या मजुराने (Migrant worker commits suicide ) नागपूर-वर्धा सीमेवर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हैदराबादेतून 450 किमी चालत वर्ध्यात पोहोचला, गोंदियाला जाताना थकला, वाटेतच गळफास

वर्धा : हैदराबाद येथून 450 किमी चालत आलेल्या मजुराने (Migrant worker commits suicide ) नागपूर-वर्धा सीमेवर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मजुराला गोंदियाच्या देवरी तालुक्यातील चिल्लारी गावात जायचे होते. त्यासाठी त्याने हैदराबाद येथून वर्ध्याच्या गिरडपर्यंत 450 किमीचा पायी प्रवास केला. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवरजवळील गिरड येथे आल्यावर तो थकला आणि नैराश्यात त्याने आत्महत्या केली (Migrant worker commits suicide).

आत्महत्या करणाऱ्या मजुराचं नाव अमरसिंह मडावी असं आहे. अमरसिंहने गुरुवारी (30 एप्रिल) नागपूर-वर्धा सीमेवर गिरड परिसरात अजय झाडे या शेतकऱ्याच्या शेतात आत्महत्या केली. सुरुवातील अमरसिंहच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण मृतदेहाजवळ असलेल्या मोबाईलमुळे हा तिढा सूटला. पोलिसांनी मोबाईल चार्ज करुन त्याच्या कुटुंबियांचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्याचा पत्ता शोधून काढण्यात आला.

अमरसिंह मडावी गेल्या दीड महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे बांधकामासाठी गेला होता. लॉकडाऊनदरम्याने काम बंद पडलं. अचानक काम थांबल्यामुळे त्याला काही सुचेनासे झाले. काम सुरु होईल या प्रतीक्षेत पुढचे चार दिवस निघाले. मात्र, काम चार दिवसांनंतरही सुरु न झाल्याने त्याने घरी जाण्यााचा निर्णय घेतला. त्याने हैदराबाद येथून गोंदियाला जाण्यासाठी पायी प्रवास सुरु केला. त्याच्यासोबत आणखी एक मजूर होता.

अमरसिंह मडावी याने आपल्या मित्रासोबत हैदराबाद येथून 450 किमीचा पायी प्रवास केला. या दोघांना वर्धा-नागपूर सीमेअगोदर एक ट्रक भेटला. या ट्रकने त्यांना आश्रय दिला. ट्रकमध्ये असंख्य मजूर होते. हा ट्रक नाश्त्यासाठी गिरड येथे थांबवण्यात आला. सर्व मजुरांच्या नाश्त्यानंतर ट्रक पुन्हा आपल्या वाटेला लागला. मात्र, अमरसिंहला न घेताच ट्रक निघून गेला. ट्रक सुरु झाला त्यावेळी अमरसिंह लघुशंकेसाठी थांबला होता. ट्रक निघून गेल्यानंतर अमरसिंह हताश झाला आणि नैराश्यात गेला. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ

पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात

पुण्यात जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस, मोबाईल टॉवर कोसळला

Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *